फेब्रुवारी महिना सुरु आहे आणि दिवसेंदिवस ऊन वाढतंय. उन्हाळा हळूहळू जाणवू लागलाय. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अनेक तज्ज्ञ या काळात नियमितपणे सनस्क्रीन वापरण्याची शिफारस करतात. सनबर्न, टॅनिंग आणि सुरकुत्या टाळण्यासाठी हा सल्ला दिला जातो.
उन्हाळ्यात कडक ऊन आणि वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. या काळात लोकांना उन्हाळ्यात सनस्क्रीन लावण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अनेक लोकांना असे वाटते की सनस्क्रीन केवळ सौंदर्य वाढविण्यासाठी लावली जाते. परंतु ती त्वचेसाठी खूप महत्वाची असते. उन्हात असलेले हानिकारक किरण त्वचेला आतून नुकसान पोहोचवू शकतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास सनबर्न, टॅनिंग, फ्रीकल्स, अकाली सुरकुत्या पडणे आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. सनस्क्रीनचा नियमित वापर केल्याने त्वचेचे या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते.
सामान्यत: उन्हाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी कमीतकमी १५ ते २० मिनिटे सनस्क्रीम लावली पाहिजे आणि दर २ ते ३ तासांनी पुन्हा लावणे आवश्यक आहे. विशेषत: सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सूर्य सर्वात जास्त तळपत असतो. म्हणून या वेळी अतिरिक्त काळजी घ्यावी. मुले, वृद्ध आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्री, सनग्लासेस आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे देखील महत्वाचे आहे. पुरेसे पाणी पिणे आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवणे देखील त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संतुलित आहारामुळे त्वचा आतून मजबूत होण्यास मदत होते. उन्हाळ्यात वाढलेले तापमान, घाम, धूळ आणि तीव्र सूर्यप्रकाश यामुळे त्वचेवर ताण येतो. त्यामुळे या ऋतूत त्वचेची योग्य आणि नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.





