पिंपरी-चिंचवड | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरु असताना पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या दृष्टीकोनातून पावलं टाकली आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून पिंपरी-चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? म्हणून चर्चा सुरु झाली आहे.
शरद पवारांचा फोटो लावण्यावरून विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, पवार साहेब एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो माझ्या दालनात कायम राहील. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अजितदादाही शेवटच्या क्षणापर्यंत तशी चर्चा करायचे. अजित दादांच्या अंतर्मनात ते विलीनीकरण नेमकं कोणतं? हे मला ठाऊक नाही, परंतु दादांची भावना मात्र तशाच प्रकारची होती. असा दावा भोईरांनी केला आहे. आता विलीनीकरणाबाबत आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं भोईर म्हणालेत.








