राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा

पुणे | विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. महायुतीत भाजपा पाच, एकनाथ शिंदेंची शिवसेना दोन तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एका जागेवर निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर निवडणूक लढवता येणार आहे. सध्या सर्व पक्षांमधील इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कोअर कमिटीची उद्या मुंबईमध्ये या निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीसाठी महत्वाची बैठक होणार आहे. यासंबंधी पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार असून त्यापैकी एकाचे नाव निश्चित होणार आहे. 

अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांची पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बघायला मिळत आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीचा उमेदवार निश्चित करण्यामध्येही पार्थ पवार यांची भूमिका महत्वाची राहील असे सूत्रांकडून समजते. यानिमित्ताने एका विश्वासू सहकाऱ्याला विधान परिषदेवर संधी देऊन पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्याच्या माध्यमातून काम करता येणार आहे. महाराष्ट्रात पुढची तीन वर्षे तरी महत्वाची निवडणूक नाही. तीन वर्षांनंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्षाचे संघटन आतापासूनच मजबूत करून निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळवून द्यायचं असेल तर, पार्थ पवार यांना त्यांची स्वतःची विश्वासू टीम लागेल. जुन्या नेत्यांबरोबरच नव्या दमाच्या शिलेदारांना संधी देऊन पक्षाच्या टीममध्ये विश्वासू सहकाऱ्यांना आणण्याची पार्थ पवारांना ही संधी ठरू शकते.

इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार हे ३० एप्रिल रोजीच स्पष्ट होईल. परंतु, चर्चेत असलेल्या नावांवर विचार करता परिवार आणि पक्ष संघटना याच्याशी एकनिष्ठता असलेल्या व्यक्तीला संधी मिळू शकते. विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे विश्वासू सहकारी मानले जातात. याबरोबरच पक्षाचे नेतृत्व दिवंगत अजित पवार यांच्याबरोबरही विक्रम काकडे यांनी काम केले आहे आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील संजय काकडे माजी खासदार आहेत. सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी माजी आमदार आहेत आणि राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी आमदार असून प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या चर्चेत असलेल्या नावांपैकी उद्या होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Share this article
Shareable URL
Prev Post

ढोल-ताश्याच्या गजरात विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा

Next Post

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जीतो अ‍ॅपेक्सकडून मलेशियात होणारी ‘पॅट्रॉन मेंबर्स कॉन्क्लेव्ह’ रद्द

Read next

लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के नए पदाधिकारियों का भव्य पदस्थापना समारोह संपन्न

पुणे | रैडिसन होटल, गोवा में लायंस क्लब ऑफ पूना गणेशखिंड के लायन वर्ष 2026–27 के नव-निर्वाचित पदाधिकारियों एवं…

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा; आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान…

मार्केटयार्डातील गुळ-भूसार व्यापाऱ्यांचा २५ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप

पुणे | मार्केटयार्डातील गुळ-भूसार विभागातील व्यापाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार…