पुणे | पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा लागू केल्याने किसान क्रेडिट कार्डधारक पशपालकांनी घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याज दरात ४ टक्के सवलत देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी असलेल्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर खेळत्या भांडवलावरील घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याज दरात ही सवलत मिळणार आहे.
पशुपालन व्यवसायासाठी किसान क्रेडिट धारकांनी राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी हँका व जिल्हा सहकारी बँक यांच्या मार्फत घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जाच्या व्याजावर हे ४ टक्के सवलत मिळणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ २५ हजार मांसल कुक्कुट पक्षी, ५० हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी, ४५ हजार किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट, १०० किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा, ५०० किंवा त्यापेक्षा कमी मेंढी, शेळी गोठा आणि २०० किंवा त्यापेक्षा कमी वराह असलेल्यांना मिळणार आहे.
अटी व शर्थी
या योजनेसाठी काही अटी व शर्थी देखील आहेत. प्रकल्प धारकाने शासनाच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा, पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुधनाची एनडीएलएम (भारत पशुधन) पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे आणि कर्ज उचललेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत कर्ज फेड आवश्यक आहे. या अटी व शर्थी या योजनेसाठी आहेत.







