माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे | दिव्यांची आरास आणि सुरैल मराठी व हिंदी गीतांसोबत भक्ती गीतांच्या सुरैल मैफिलीने सोमवारची संध्याकाळ बहारदार झाली. ‘दिवाळी संध्या’ मधील सुरैल गीतांचा हा कार्यक्रम माँ आशापुरा माता मंदिरात लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
दिवाळी हा सण दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पवित्र सणाच्या निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिरात दिवे, पणत्या लावून दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली. यावेळी लकी ड्रॉ पद्धतीने निवडण्यात आलेल्या जोडप्यांना आरतीचा सन्मान मिळाला. यानंतर प्रसिद्ध गायक चैतन्य कुलकर्णी आणि सन्मिता शिंदे यांच्या गायनाचा ‘दिवाळी संध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. याप्रसंगी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष विकास अगरवाल, लायन श्याम खंडेलवाल, लायन मंगेश कटारिया, लायन राजेंद्र गोयल, लायन जिनेंद्र लोढा आदी मान्यवर आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘दिवाळी संध्या’च्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे व गायक चैतन्य कुलकर्णी यांनी लोकप्रिय मराठी व हिंदी गाणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी सूर निरागस हो… कानडा राजा पंढरीचा… यासारखी भक्तिगीते, रेशमाच्या रेघांनी… ही लावणी, पाहिले न मी तुला सारखी मनाला स्पर्शून जाणारी मराठी गीते, तर लग जा गले… ये जो मोहब्बत है…, कहना है कहना है… गुन गुना रहे है भंवरे… अशा अजरामर झालेल्या हिंदी गाण्यांनी दिवाळी संध्या चा कार्यक्रम खूपच बहारदार झाला. सायंकाळच्या सुंदर व प्रसन्न वातावरणात आशापुरा माता मंदिराच्या प्रांगणात सादर झालेल्या या कार्यक्रमात सर्वजण अक्षरशः न्हाऊन निघाले.
दिवाळी म्हणजे आनंद व उत्साहाचे पर्व!
दिवाळी हा सण संपूर्ण भारत वर्षात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. आपला देशाची ओळख सांगताना दिवाळीचा उल्लेख होतो इतका हा सण महत्वाचा आहे. दिवाळी निमित्त परिवारातील सर्व सदस्य एकत्र येतात. मित्र परिवारासह दिवाळी साजरी केली जाते. यानिमित्त आनंद व उत्साह असतो. दिवाळी सणाला सांस्कृतिक दृष्टीकोनातूनही महत्व आहे. त्यामुळे माँ आशापुरा माता मंदिरात लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या सहयोगाने दिवाळी संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सर्व मित्र परिवार भेटतात व आनंद द्विगुणित होतो.
-विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)








