मार्केट यार्ड गूळ-भुसार विभागातील ‘नो यूपीआय’ आंदोलन

पुणे | व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज २ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात ‘नो यूपीआय डे’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागातील अनेक व्यापाऱ्यांनी आज यूपीआयद्वारे होणाऱ्या डिजिटल पेमेंटचा स्वीकार न करता रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य दिले. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन नाईलाजास्तव करावे लागले असल्याचे बाठिया यांनी सांगितले.

ते म्हणाले, “व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर अतिरिक्त भार निर्माण करणाऱ्या निर्णयांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार सुरळीत राहणे ही बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला आजचा ‘नो यूपीआय डे’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.”

या आंदोलनामध्ये चेंबरचे सर्व सभासद तसेच मार्केट यार्डातील अनेक व्यापारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे व्यापारी आणि ग्राहक या दोघांनाही काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला असून, त्याचा आर्थिक परिणामही झाल्याचे बाठिया यांनी नमूद केले.

शासनाने व्यापाऱ्यांच्या भावना व अडचणी लक्षात घेऊन यूपीआय व्यवहारांवर एमडीआर (Merchant Discount Rate) आकारणी करण्याचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा, अशी मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांच्या हितासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि भविष्यात व्यापारी व ग्राहक दोघांनाही अनावश्यक आर्थिक भार व गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही बाठिया यांनी व्यक्त केली.

Share this article
Shareable URL
Prev Post

आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात

Next Post

अवघ्या ६० तासांत तब्बल ६००+ फ्लॅट्सचे बुकिंग व ६०० कोटींहून अधिकची विक्री

Read next

माँ आशापुरा माता मंदिरात ९ नोव्हेंबरला ‘दिवाळी संध्या’ आणि दीपोत्सवाचे भव्य आयोजन

पुणे : दिवाळीच्या मंगल पर्वाचे स्वागत करण्यासाठी पुणे शहरातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची लगबग सुरू…

राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी विक्रम काकडेंसह चार जणांमध्ये रस्सीखेच

विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा पुणे | विधान परिषदेच्या नऊ…