पुणे । जीतो मॅट्रिमोनी, जीतो रोम झोन व जीतो पुणे चॅप्टर च्या वतीने आयोजित केलेल्या जैन समाजातील वधु-वर परिचय मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास 915 इच्छुक वधु-वरांनी कुटुंबासह नोंदणी केली होती.
या मेळाव्याला आतापर्यंतची सर्वाधिक नोंदणी झाली. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरला. मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवारास एक गार्डियन दिला होता. त्यामुळे विवाह जुळण्यासाठी आणि आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करण्यासाठी या गार्डियन चा उपयोग झाला. ही नवीन कल्पना यावेळी राबवली गेली आणि त्याच खूप चांगला फायदा झाला.
माहिती-तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे जग जवळ आले असले तरी जैन समाजातील विवाह इच्छुक वधु-वरांच्या लग्नाचा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. व्यापार, व्यवसायाच्या निमित्ताने जैन समाज देशाच्याच नव्हे तर, जगाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झाला आहे. त्यामुळे योग्य वधु किंवा वर शोधताना समस्या भेडसावत आहेत. आणि योग्य वधु-वरासाठीच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत जैन समाजातील विवाहयोग्य वधु-वरांना आपल्या जीवनाचा साथीदार निवडताना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून जीतोच्या वतीने वधु-वर परिचय मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. यासाठी देशभरातून नोंदणी झाली होती.
या वधु-वर परिचय मेळाव्यास जीतो अॅपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, हिमांशू शाह, ललीत डांगी, जीतो अॅपेक्सचे संचालक राजेश सांकला, सुजीत भटेवरा, अॅड. एस. के. जैन, इंदर जैन, रवी सांकला, जीतो रोम झोन चेअरमन राजेंद्र जैन, मुख्य सचिव तृप्ती कर्नावट, मॅट्रिमोनी अॅपेक्स मुख्य सचिव राजेश्वरी जैन, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, मुख्य सचिव दिनेश ओसवाल, लेडीज विंग चेअरपर्सन एकता भन्साळी, युथ विंग चेअरमन आकाश ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
जीतो मॅट्रिमोनी संचालक प्रियांका परमार व जिनेंद्र लोढा यांनी या मेळाव्याच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबागसिंग बिर यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी विवाह परिचय मेळाव्यात विवाह क्षेत्रात निस्वार्थ भावनेने आयुष्यभर कार्य करणाऱ्या तीन मान्यवरांचा मुंबईचे नवीन नहार, पुणेचे पृथ्वीराज धोका आणि सुभाष ललवाणी यांना सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
यावेळी काव्या सेंदाणी आणि राहुत कपूर यांनी फाइडिंग द राईट पार्टनर हा विशेष कार्यक्रम सादर केला.
शंभर टक्के परिपूर्ण कोणीच नसते
विवाह जमवताना विवाह इच्छुक वधु आणि वर यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणीच शंभर टक्के परिपूर्ण नसतो. प्रत्येकाचा संसार आपण बघितला तर, नवरा-बायकोने एकमेकांना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. एकमेकांना पूरक बनूनच संसार करायचा असतो. त्यासाठी आपल्या घरातील, नात्यातील आणि समाजातील वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शनाची आवश्यकता असते. जैन समाजातील नवीन पिढीतील विवाहयोग्य वधु-वर मुलांचे लग्न जुळण्यासाठी जीतो तर्फे खूप यशस्वीपणे या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधीतांचे विशेष आभार! पालकांनी यावेळी विशेष उपस्थिती लावल्याबद्दल त्यांचेही आभार!
- विजय भंडारी (राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अॅपेक्स)








