माँ आशापुरा मंदिरात नवरात्रनिमित्त पुणे गॉट टॅलेंट स्पर्धेचे दिमाखात आयोजन

पुणे | माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त ‘पुणे गॉट टॅलेंट’ स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले.नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ही स्पर्धा प्रामुख्याने दोन वयोगटांत घेण्यात आली; ज्यामध्ये १४ वर्षे वयोगटाखालील आणि १४ वर्षांवरील वयोगटाचा समावेश होता. दोन्ही गटांतील स्पर्धकांनी नृत्य, गायन, वादन, मिमिक्री आणि नाट्यछटा, योगा अशा विविध कलाप्रकारात आपले कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बालचमूंनी सादर केलेल्या बहारदार कलाविष्काराला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली, तर मोठ्यांच्या गटात एकापेक्षा एक सरस सादरीकरण पाहायला मिळाले.

पुणे गॉट टॅलेंटच्या दोन गटांपैकी १४ वर्षे वयोगटाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक प्रिशा शहा, द्वितीय क्रमांक ईशा भलगट व तृतीय क्रमांक नीव लोढा याने पटकावला. तर, १४ वर्षे वयोगटावरील गटात प्रथम क्रमांक पुष्कर जैन, द्वितीय क्रमांक लहर मित्तल तर, तृतीय क्रमांक सुयेश जैन याने पटकावला. धानी जैन ला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

कार्यक्रमाचे संयोजन माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने अतिशय नेटके आणि सुनियोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण आनंद अगरवाल, कल्याणी दर्डा व लीना खंडेलवाल या तज्ज्ञ परीक्षकांनी केले. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी अमोल कुचेरिया, टीना अगरवाल, सीए दीपक जैन, मोना लोढ़ा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“अशा स्पर्धांमुळे शहरातील नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळते आणि त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे.”

  • विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)
Share this article
Shareable URL
Prev Post

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पाठपुराव्याला यश; यूपीआयवरील एमडीआर शुल्काची अंमलबजावणी दिवाळीनंतर

Next Post

माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘श्री सूक्त पठणाचे’ आयोजन

Leave a Reply
Read next