पुणे | दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आता शिक्षकांना प्रत्यक्ष हातात मिळणार नाहीत. तर, त्या संगणकावर तपासल्या जाणार आहेत. यासाठी उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जाणार असून डिजिटल पोर्टलद्वारे त्या शिक्षकांना संगणकावर दिसणार आहेत. शुक्रवारी सीबीएसईच्या वतीने दिल्लीमध्ये सीबीएसई शाळांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली.
शिक्षकांना वैयक्तिक लॉग इन
शिक्षकांना डिजिटल पोर्टल आणि सराव डिजिटल मूल्यमापनासाठी बोर्डाकडून वैयक्तिक लॉगिन आयडी व पासवर्ड दिले जाणार आहेत. ज्या शिक्षकांचा डेटा ऑनलाईन एफिलेटेड स्कूल इन्फ़ॉर्मेशन सिस्टम (ओएसएस) प्रणालीत अपडेटेड आहे त्याच शिक्षकांना हे काम करता येणार आहे.
एआय द्वारे पेपर तपासणार?
दहावी-बारावीचे पेपर आता एआय द्वारे तपासले जाणार अशी अफवा पसरली आहे. परंतु, यामध्ये तथ्य नसून पेपर संगणक प्रणालीद्वारे शिक्षकच तपासणार आहेत. उत्तरपत्रिका संगणकावर उपलब्ध होतील. आणि तिथेच त्या तपासल्या जातील व गुण दिले जातील.





