अकोले | अलिकडच्या काळात लग्न हा विषय खर्चिक होऊन बसलाय. मुलांची स्वप्न, दुसऱ्यानं केलं म्हणून आपल्याही लग्नात हे झालंच पाहिजे म्हणूनचा अट्टाहास… अशा अनेक कारणांनी लग्न हा कौटुंबिक सोहळा असण्याचाच विसर पडला आहे. कर्ज काढून किंवा जमीन वा इतर प्रॉपर्टी विकून दणक्यात लग्न करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. परंतु, या भपकेबाजपणाला फाटा देत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अकोले गावात नुकत्याच झालेल्या लग्न सोहळ्याने आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.
अकोले गावातील गणेश सुबनावळ व हेमाली सुर्यवंशी यांची मुलगी यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. गणेश सुबनावळ हा पुणे जिल्हा युवक काँग्रेसचा सरचिटणीस आहे. त्यामुळे लग्नाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी होणार हे साहजिक होते. मात्र, वर व वधु कुटुंबियांनी विवाह सोहळ्यास येणाऱ्या मान्यवरांना पुस्तक व एक रोप देण्याचा संकल्प केला. आपण वाचन केलं तर, आपल्याला माहिती मिळेल. ज्ञानात भर पडेल आणि चुकीच्या प्रथा, परंपरा कमी होतील. त्यामुळे पुस्तक देण्याचा निर्णय झाला. आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला पर्यावरणाचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होतोय. पर्यावरणाचं महत्व समजावं आणि त्यासाठी कृतीशील प्रयत्न व्हावेत म्हणून वृक्षारोपण केले जावे या उदात्त हेतुने पुस्तकासोबत एक रोप देण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांनी घेतला. त्यानुसार विवाह सोहळ्यास नववधू व वरास आशिर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांना पुस्तक व रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
लग्नात बेफाम खर्च करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक होती. जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा समजला जाणाऱ्या लग्न सोहळ्यावेळी वाचन व पर्यावरण रक्षणासाठी अकोले येथील सुबनावळ आणि सुर्यवंशी कुटुंबाने पुस्तक आणि रोप देऊन मान्यवरांच्या केलेल्या सत्काराची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होतेय व त्यांचे कौतुक होतेय. विशेष म्हणजे भेट दिलेल्या पुस्तकांमध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आपले संविधान, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, शहीद भगतसिंगांचे तरुणांना आव्हान, मी नास्तिक का आहे? देशावर फॅसिझमचे संकट, भेदाभेद भ्रम अमंगळ, विवेकवादी विज्ञानवादी, समाजवादी विवेकानंद या पुस्तकांचा समावेश होता. सुमारे २०० मान्यवरांचा ही पुस्तके व रोप देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमामुळे समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. तसेच विवाह सोहळ्यासाठी केल्या जाणाऱ्या भरमसाठ खर्चाला आळा बसेल. या उपक्रमातून चांगला पायंडा पडावा, असे वराचे वडील आण्णासो सुबनावळ यांनी सांगितले.








